News - ‘भाऊंच्या आठवणीतील दिंडी’ने स्मृतींना वंदन भाऊंनी संस्कारीत केलेले जीवनव्रत जपूया - अनिल जैन

जळगाव (प्रतिनिधी) दि. 12 :- श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भाऊंच्या समाधीस्थळी पहाटे जैन परिवारासह आप्तेष्ट, स्नेहीजन व कंपनीतील सहकाऱ्यांनी पुष्पअर्पण करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले. यानंतर भाऊंच्या आठवणीतील दिंडीने मोठ्याभाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. ‘भाऊंनी अंगिकारलेला सकारात्मक दृष्टिकोन, संस्कारीत केलेले जीवनव्रत जपूया’ असे जैन हिल्सवरील श्रद्धाधाम येथे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले.

भवरलालजी जैन यांच्या वाढदिवसानिमित्त साकारलेल्या प्राणवायू बागेचे उदघाटन करताना जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, अतुल जैन यांच्यासह जैन परिवारातील सदस्य.

श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या वाढदिवसानिमित्त जैन हिल्स येथील गौराई बंगल्याजवळ जैन परिवारासह सर्वच सहकारी पहाटे जमले होते. त्यानंतर भाऊंच्या समाधिस्थळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभय जैन, अथांग जैन, तसेच जैन परिवारातील सदस्य गिमी फराद, आनंद गुप्ते, डॉ. सुभाष चौधरी, अमर जैन, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. सौ. भावना जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्वच सदस्यांनी वंदन केले. श्रद्धाधाम येथे जैन परिवार व सहकारी जमले. याठिकाणी अनिल जैन यांनी भाऊंच्या आठवणींना उजाळला दिला. भाऊंचे जीवन जणू उत्सवच असल्याचे सांगत भाऊंचे विचार पथदर्शक मानून आपण वाटचाल केली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या विचाराने भाऊंना झपाटले होते. ‘जेव्हा मी पृथ्वीवर राहील त्यावेळी सुद्धा मी केलेल्या कामाचा प्रत्यय येत राहील आणि माझ्या नंतरही समाज आणखी चांगला होईल.’ असे विचार करून ते स्वतः कृतित आणणारे मोठेभाऊ शतकानंतर एखादेच होते. भारतीय संस्कृतीवर आधारीत जीवनमूल्यांना नवतंत्रज्ञानाची जोड देत भाऊंनी शेतीपूरक व्यवसायाची वृद्धी करून शेतकऱ्यांचे जीवनमान बदलविले. भाऊ आपल्यात नसले तरी त्यांचे प्रेरणा देणारे विचार आपल्यात आहेत. भाऊंनी सुरू केलेला यज्ञ असाच पुढे चालवायचा असल्याने भाऊंनी संस्कारीत केलेले जीवनव्रत जपून येणाऱ्या काळात वॉटर युनिर्व्हसिटी, जीआरएफच्या माध्यमातून दीडशे खेड्यांमध्ये काम करायचे आहे. यासाठी भाऊंनी दिलेली उत्स्फूर्त ऊर्जा कामी येणार असल्याचे अनिल जैन यांनी सांगितले.

प्राणवायु बागेमध्ये 80 वृक्षांचे लागवड

श्रद्धाधाम येथून ‘भाऊंच्या आठवणीतील दिंडी’ला सुरवात झाली. दिंडीत जैन परिवारातील सर्व सदस्य व सहकारी सहभागी झाले. सालदारांच्या हाती भाऊंचे विचारधन पोस्टर रूपातून सर्वांना आठवण करून देत होते. यावेळी सालदार त्यांच्या सौभाग्यवतींसह दिंडीत सामील झाले होते. ही दिंडी जैन वाडा परिसरात पाण्याच्या टाकीजवळ येवून थांबली. याठिकाणी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त प्राणवायु बाग, लाखीबाग, मधमाशी बाग विकसीत करण्यात आली. यात विविध फुलझाडांसह 80 रोपांची लागवड करण्यात आली. या बागेचे उद्घाटन अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

मुरघास प्रकल्पाचे उद्घाटन

उन्हाळ्यात निर्माण होणारी चारा टंचाई पाहता डॉ. अनिल ढाके व सहकाऱ्यांनी मुरघास प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाचे उद्घाटन अशोक जैन व जैन परिवारातील सदस्यांनी केले. यावेळी अनिल पाटील यांनी तयार केलेल्या गरूडाची प्रतिकृती जैन परिवाराला देण्यात आली. ही प्रतिकृती जैन परिवारातील तिसऱ्या पिढीतील अथांग, अभेद्य, अभंग, आत्मन, अन्मय जैन यांनी स्वीकारली. यानंतर सर्व सहकाऱ्यांनी गोशाळेतील गायींना चारा, गुळ भरविले.

‘भाऊंच्या आठवणीतील दिंडी’त सहभागी झालेले जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, अतुल जैन, अथांग जैन यांच्यासह जैन परिवारातील सदस्य आणि कंपनीतील वरिष्ठ सहकारी.
 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved