News - लोकसहभागातून सर्वांगिण विकासासाठी वावडदा, वाकोद गाव दत्तक घेणार- जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन

स्व. गौराई हिरालालजी जैन बहुउद्देशीय केंद्राचे वावडद्यात मान्यवरांचेहस्ते भूमिपूजन,
डॉ. भवरलालजी जैन शुद्धपेयजल सयंत्राचे धानोरा येथे लोकार्पण


वावडदा येथे स्व. गौराई हिरालालजी जैन बहुउद्देशीय केंद्राचे भूमिपूजन प्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा शेजारी डावीकडून उजवीकडे सेवादास दलूभाऊ जैन, राजाभाई मयूर, कविवर्य ना.धों. महानोर, डॉ. सुभाष चौधरी

जळगाव दि. 25/2/2018, – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दुसऱ्या श्रद्धावंदन दिनानिमित्त वावडदा येथे स्व. गौराई हिरालालजी जैन बहुउद्देशीय केंद्राचे विधिवत भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ‘बा-बापू 150’ यांच्या जयंती उपक्रमांतर्गत भारतातील 150 खेड्यांचा विकासाचा आराखडा जैन इरिगेशन तयार करणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणून वावडदा आणि वाकोद या गावांना विकासासाठी दत्तक घेणार असल्याची घोषणा केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती, जलसंधारण अशी कामे लोकसहभागातून करून गावाचा विकास केला जाईल असेही आश्वासन यावेळी अशोक जैन यांनी दिले. याच श्रुंखलेत सायंकाळी धानोरा येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे मान्यवारांच्याहस्ते धानोरा येथे सायंकाळी लोकार्पण झाले.

स्व. गौराई हिरालालजी जैन बहुउद्देशीय केंद्र वावडदाच्या भूमिपूजनावेळी जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य सेवादास दलिचंदजी जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, पद्मश्री ना.धो. महानोर, डॉ. सुभाष चौधरी, राजाभाई मयूर, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, गिरधरलाल ओसवाल, रमेशदादा जैन, डी. एम. जैन, शशीकांत जैन, विजय जैन, अभय जैन, अविनाश जैन, अथांग जैन, वावडदा सरपंच आशाबाई भील, महेंद्र बाफना, सरपंच निलेश पाटील, पी. के. पाटील, नगरसेवक अमर जैन, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी स्व.गौराई व श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यानंतर उपस्थितांची मनोगत झाली. कविवर्य ना. धों. महानोर यांनी संत तुकोबांचा संदर्भ देत मोठ्याभाऊंचे कार्य हे आकाशाएवढे विशाल असल्याचे सांगत आदारांजली वाहिली. संघपती दलिचंदजी जैन यांनी मानवतावादी दृष्टी, सहनशिलता असे दिव्यशक्ती लाभलेले अष्टपैलु व्यक्तीमत्व म्हणजे मोठेभाऊ असे सांगत. भाऊंना घडविणाऱ्या गौराई यांच्या आठवणींना दलुभाऊंनी उजाळा दिला. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी भाऊंच्या स्मृतींना अभिवादन करित भाऊंचे कार्य, आचार, विचार, संस्कार प्रत्येकासाठी प्रेरणायी असल्याचे सांगितले. तसेच भाऊंचा शेतकऱ्यांच्या सुखसमृध्दीचा यज्ञ अशोक, अनिल, अजित, अतुल जैन ही चारही पुढे नेत असल्याचा अभिमान असल्याचे सुरेशदादा म्हणाले. ब्रह्मकुमारी मिनाक्षी दीदी यांनीही शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी आई गौराई यांचे संयुक्त कुटुंबासोबतच विश्व कल्याणाचा दूरगामी विचारांचे संस्कार भवरलालजी जैन यांच्या जीवनात कसे बिंबवले गेले याबाबत सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकासोबतच वावडदा येथील देवराम पाटील, महेंद्रकुमार जैन, रवि कापडणे, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, लक्ष्मणराव पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.

अभंगवाणीव्दारे भाऊंना आदरांजली

जैन हिल्स्‌ निसर्गरम्य परिसरातील श्रध्दाधाम येथे मुंबईचे सुप्रसिद्ध गायक अनिरूद्ध जोशी यांच्या सुरेल अभंगवाणीव्दारे भाऊंना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रातःकालीन मैफीलीचा आरंभ हरिनामाच्या गजराने झाला. संत तुकारामांची अभंवाणी ‘सदा माझे डोळे, जडो तुझे मूर्ती’, ‘अबीर गुलाल उधळत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडूरंग’ या अभंगवाणीच्या एक-एक ओव्यांनी सुर्योद्यासोबतच श्रद्धेय मोठ्याभाऊंचे स्मरण उपस्थितांना होत होते. गांधीजींच्या विचारांचे कोंदण असलेल्या भाऊंच्या कार्याला नमन करण्यासाठी ‘वैष्णव जन तो तेने कहीयेजे…’, हे भक्तीगीत सादर केले. ‘माझे माहेर पंढरी…’ या भैरवीने समारोप झाला. जैन परिवारातील स्नुषा यांनी मेरी भावना गीत सादर केले. यावेळी जैन इरिगेशनचे कलाकार आनंद पाटील यांनी जलरंगव्दारे चित्र साकारले. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सहकाऱ्यांशी सुसंवाद साधला. कृषीजल या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

धानोरा येथे डॉ भवरलालजी जैन शुद्ध पेयजल संयत्राचे लोकार्पण

पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी पाण्यासाठी आयुष्य वेचले. प्रत्येक खेड्यातील जनतेला अत्यल्प दरात पिण्याचे शुद्धपाणी उपलब्ध व्हावे हा त्यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांच्या दुसऱ्या श्रद्धावंदन दिनानिमित्त धानोरा येथे भारतातील दुसऱ्या ‘डॉ. भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण’ मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी भवरलालजी जैन यांच्या 81 व्या जयंतीला कुरंगी येथे शुद्ध पेयजल सयंत्राचे लोकार्पण झाले होते. कुरंगी येथील हा भारतातील पहिलाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पद्मश्री ना.धो. महानोर, डॉ. सुभाष चौधरी, राजाभाई मयूर, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, डी. एम. जैन, शशीकांत जैन, विजय जैन, अविनाश जैन, अथांग जैन, धानोरा सरपंचा खटाबाई पाटील, पोलीस पाटील पूनम सोनवणे, राष्टीय कीर्तनकार गुलाबराव महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, ना.धो.महानोर यांनी मनोगत व्यक्त केले. गावकऱ्यांच्यावतीने संतोष पाटील यांनी देखील विचार मांडले. गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशनच्या सहकार्याने आमच्या गावाचा विकास साध्य होत आहे ही मोठी समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी धानोरा गावच्या विकासाबाबत सविस्तर अभ्यास करून लवकरच योग्य तो निर्णय घेऊ. त्याच प्रमाणे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पाउले उचलली जातील असे सांगितले.

यावेळी गावातील पेय जल संयत्र योजनेच्या गावातील लाभार्थी महिला वैशाली सोनवणे, सिंधुताई कुंभार, भारती कुंभार, अलका सोनवणे, मंगला सोनवणे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्याहस्ते पेयजल स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात आले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी विनोद रापतवार यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशनचे धानोरा गाव विकासातील योगदानाबाबत, डॉ. भवरलालजी जैन शुद्धपेयजल सयंत्राच्या शुद्ध पेयजलाबाबत माहिती प्रास्ताविकात दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले.

जैन इरिगेशनने विकासीत केलेल्या या वॉटर फिल्टरचा अमेरीकेतील यु.एस.एड. व इतर संस्थांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या डेसल प्राइजने गौरव करण्यात आला आहे. याचे संशोधन जळगाव व बोस्टन येथे करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या निकषांची पूर्तता या फिल्टरने पूर्ण केली आहे. हे तंत्रज्ञान अत्यंत दुर्गम भागात ज्या ठिकाणी विद्युतही पोहोचली नाही तिथे सौर ऊर्जेच्या सहाय्याने कार्यान्वित केले जावू शकते. पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला माणशी चार लिटर याप्रमाणे दररोज २० लिटर पाणी दिले जाईल. या प्रकल्पाची सुरवातीला देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जैन इरिगेशन पूर्ण करेल. या सयंत्राचा देखभाल करण्यासाठीचा उत्पादन खर्च पाच पैसे प्रतिलिटर असा असेल. नजीकच्या काळात पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांनी निश्चित केलेल्या जळगावच्या परिसरातील गावांमध्ये ही योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved