News - भवरलालजी जैन यांचा आज व्दितिय श्रद्धावंदन दिवस

वावडदा येथे बहुद्देशीय केंद्राचे भूमिपूजन तर धानोरा येथे डॉ भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण


जळगाव दि. 24 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा दुसरा श्रद्धावंदन दिवस 25 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या निमित्त वावडदा येथे स्व. गौराबाई हिरालालजी जैन बहुउद्देशीय केंद्राचे भूमिपूजन, तर धानोरा येथे पद्मश्री डॉ भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण होणार आहे. सेवादास दलुभाऊ जैन, मा. सुरेशदादा जैन, डॉ. सुभाष चौधरी, राजाभाई मयूर, कविवर्य ना.धों. महानोर, गिरधर ओसवाल, डी.एम. जैन, अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन व अतुल जैन यांच्यासह जैन परिवाराचे सदस्य या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

जळगावपासून जवळच असलेले वावडदा हे भवरलालजी जैन यांचे आजोळ. स्व. गौराबाईंचा जन्म वावडद्याचा त्यामुळे जैन परिवारास वावडदा गावा बद्दल निस्सिम प्रेम, आपुलकी आहे. याच जिव्हाळ्याने जैन परिवार या ठिकाणी स्व. गौराबाई जैन बहुउद्देशीय केंद्र निर्माण करीत आहे. हा कार्यक्रम सकाळी 9.45 ला वावडदा येथे होईल.

पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी पाण्यासाठी आयुष्य वेचले. प्रत्येक खेड्यातील जनतेला अत्यल्प दरात पिण्याचे शुद्धपाणी उपलब्ध व्हावे हा त्यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांच्या दुसऱ्या श्रद्धावंदन दिनाच्या औचित्याने 25 फेब्रुवारी 2018 ला सायंकाळी 4.30 वाजता भारतातील दुसऱ्या ‘डॉ भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण’ होणार आहे. 12 डिसेंबर रोजी भवरलालजी जैन यांच्या 81 व्या जयंतीला कुरंगी येथे शुद्ध पेयजल सयंत्राचे लोकार्पण झाले होते. कुरंगी येथील हा भारतातील पहिलाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.

जैन इरिगेशन मार्फत विकसित कऱण्यात आलेल्या या वॉटर फिल्टरचा अमेरीकेतील यु.एस.एड. व इतर संस्थांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या डेसल प्राइजने गौरव करण्यात आला आहे. याचे संशोधन जळगांव व बोस्टन येथे करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या निकषांची पूर्तता या फिल्टरने पूर्ण केली आहे. हे तंत्रज्ञान अत्यंत दुर्गम भागात ज्या ठिकाणी विद्युतही पोहोचली नाही तिथे सौर ऊर्जेच्या सहाय्याने कार्यान्वित केले जावू शकते. पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला माणशी चार लिटर याप्रमाणे दररोज २० लिटर पाणी दिले जाईल. या प्रकल्पाची सुरवातीला देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जैन इरिगेशन पूर्ण करेल. या सयंत्राचा देखभाल करण्यासाठीचा उत्पादन खर्च पाच पैसे प्रतिलिटर असा असेल. नजीकच्या काळात पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांनी निश्चित केलेल्या जळगावच्या परिसरातील गावांमध्ये ही योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved