News - जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना कांताई जैन-साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार, बालकवी ठोमरे, बहिणाबाई व ना. धों महानोर पुरस्काराचेही थाटात वितरण

पुरस्कारार्थी राम सुतार, मेघना पेठे, अजय कांडर, रफिक सूरज यांच्यासमवेत डॉ. भालचंद्र नेमाडे,
ना. धों. महानोर, दलिचंद जैन, अशोक जैन, आनंद गुप्ते.

जळगाव, दि.25 फेब्रुवारी 2020, भवरलाल जैन यांनी मोठ्या कल्पकतेने साहित्यांची बळकटी येण्यासाठी, भाषेला समृद्ध करण्यासाठी पुरस्कार सुरू केले. साहित्याखेरीज विविध क्षेत्रांचे कार्य अधोरेखित करून 25 च्या वर पुरस्कार दिले जातात. याबाबत त्यांनी विशेष कौतूक केले. स्त्री भृण हत्या ही शिक्षित समाजामध्ये जास्त आढळून येते हि चिंता देखील त्यांनी व्यक्त केली. सध्या महिलांवरील अत्याचाराचे मूळ हेच आहे असे सांगत कायदासुव्यवस्थेसह पोलीस, सैन्य दलातील महिलांना अग्रक्रमाने स्थान दिले पाहिजे असेही सुचवले. सर्व पुरस्कार विजेते यांचे साहित्य व कलेविषयी कार्य हे राष्ट्र, धर्म, जात, लिंग यापलिकडेचा विचार करणारे आहे. सर्व पुरस्कारार्थी आप-आपल्या क्षेत्रात दिग्गज आहेत, अशा व्यक्तींचा सत्कार ही चांगली बाब होय असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतीदिनी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पहिला व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार' जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे आहे. श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि.सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांना समारंभ पूर्वक वितरण करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा होय. सर्व पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कारासोहळ्याचे उद्घाटक कविवर्य ना.धों. महानोर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आनंद गुप्ते उपस्थित होते. जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

बहिणाईंच्या नावासारखा निर्मळ पुरस्कार कोणता – मेघना पेठे

बहिणाई या अलौकीक होत्या. त्यांचे साहित्य जगाला दिशा देणारे होते. त्यांच्या नावाने दिला जाणारा यासारखा निर्मळ पुरस्कार कोणता असे सांगत. पर्यावरणाची दृष्टी असलेल्या वातावरणात जैन परिवाराने जपलेला निसर्गाच्या सान्निध्यातील कृतज्ञतापूर्वक सोहळ्यात हा पुस्कार दिल्याने आनंद आहेच. औचत्य आणि सत्य पाळणे कठिण. पुरस्काराकडे पाहताना निरसता होते. मात्र पुरस्काराकडे पाहताना जीवनाने व्यक्त होताना भावनांचा आदरातुन लेखन होते तोच पुरस्कार महत्त्वाचा वाटतो असे त्या सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या.

संवादाची जागा शोधण्यासाठीचा पुरस्कार - अजय कांडर

आधुनिक काळाशी जुळवून घेताना आपले मुळ शोधले पाहिजे. सध्या माणूस माणसाकडे जाण्याची प्रक्रिया कुठेतरी मंदावली आहे. यातील संवेदनशीलता जपण्याची संवादाची जागा शोधण्याची प्रेरणा म्हणजे हा पुरस्कार आहे. भवरलालजी जैन व त्यांच्या परिवाराने मातीशी संवाद ठेवला. राजकारण्यांचा चेहरा काळवंडला जातो तेव्हा सांस्कृतिक चेहरा उजळवावा लागतो ते काम भवरलालजी जैन व अशोक जैन यांनी केले आहे, असे सत्काराला उत्तर देताना अजय कांडर म्हणाले.

सर्जनशील लेखनाला बळ देणारा पुरस्कार - रफिक सुरज

साहित्य हे जगण्यातून येते. ते जगण्याच्या पलिकडे घेऊन जाते म्हणजे साहित्य असे सांगत पर्यावरण गुदमरून टाकणा-या वातावरणातुन माझ्या साहित्याची निर्मिती असे रफिक सुरज म्हणाले. सध्या समाजात सामाजिक आरोग्य बिघडले आहे. यात समन्वय वाढावा एकोपा टिकून राहावा यासाठी सर्जनशील मनाजोगं साहित्य माझ्या हातून निर्माण होत नाही परंतू हा पुरस्कार मला नेहमीच चांगल्या लेखणासाठी नेहमीच प्रेरणा देत राहिल.

प्रत्येक आर्टिस्टने झाडाप्रमाणे काम करावे- राम सुतार

पुरस्कार हे स्फूर्ती देणारे असतात. काम करताना पुरस्कार मिळावे ही आस ठेवू नये. फक्त सकारात्मक चांगल्यातील चांगले निर्माण करित राहणे हेच आर्टिस्टचे ध्येय पाहिजे. एखाद्या झाडाप्रमाणे कार्य करित राहणे हाच उद्देश कलाकाराचा असावा. आपल्या झाडाची फळं-फुलं कोण घेतं याचा विचार कलाकाराने कधीच करू नये असे सत्काराला उत्तर देताना जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी सांगितले.

पसायदानाने सुरूवात झाली. ना.धों.महानोर यांच्याहस्ते लढाखचे लोकवाद्य वाजवून आगळेवेगळ्या पद्धतीने उद्घाटन झाले. पुरस्काराविषयीची भूमिका आनंद गुप्ते यांनी प्रस्तावनेत सांगितली. चारही पुरस्कार विजेत्यांच्या कार्यपरिचयात्मक डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

 

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved