News - ‘पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन शुद्ध पेयजल योजने’चा आज शुभारंभ
कुरंगी ग्रामस्थांचा योजनेसाठी लोकसहभागातून पुढाकार
जळगाव, प्रतिनिधी दि.११ – सतत नाविन्याचा ध्यास व नवतंत्रज्ञानाच्या नित्य नूतन शोधातून जनसामान्यांच्या जीवनात बदल कसा आणता येईल, यासाठी पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी आयुष्य वेचले. प्रत्येक खेड्यातील जनतेला अत्यल्प दरात पिण्याचे शुद्धपाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. याचाच एक भाग असलेल्या जैन इरिगेशनचे संशोधनातून विकसित करण्यात आलेले वॉटर फिल्टर अर्थात शुद्ध पेयजल सयंत्र जागतिक पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे सयंत्र आता लोकसहभागाच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावासाठी उपलब्ध करून दिले जात आहे.
पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या ८१व्या जयंती निमित्त १२ डिसेंबर २०१७ रोजी पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे या प्रकल्पाचा शुभारंभ संघपती सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होत आहे. सकाळी ११ ला कुरंगी येथे बसविण्यात आलेल्या या प्रकल्पाचा शुभारंभाप्रसंगी कुरंगीचे सरपंच गजानन पवार, उपसरपंच शेख अमीन शेख हुसेन, विकासोचे चेअरमन बुधा गंगाराम भोई, ग्रा.पं.सदस्य विमल मधुकर पाटील, उषाबाई विठ्ठल पाटील उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे स्वप्न पाहिले होते. याचबरोबर त्यांनी ग्राम विकासासाठी सातत्याने पुढाकार घेत लोकसहभागालाही भर दिला होता. लोकसहभागातून साकारलेल्या योजनांना दीर्घकाळ कार्यरत राहतात हे लक्षात घेवून हे सयंत्रही लोकसहभागातूनच खेड्यात बसविण्याचा त्यांचा मानस होता. पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला माणशी चार लिटर याप्रमाणे दररोज २० लिटर पाणी दिले जाईल. या प्रकल्पाची सुरवातीला देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जैन इरिगेशन पूर्ण करेल. या सयंत्राचा देखभाल करण्यासाठीचा उत्पादन खर्च पाच पैसे प्रतिलिटर असा असेल. आगामी काळात पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांनी निश्चित केलेल्या जळगावच्या परिसरातील 30 गावांमध्ये ही योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे.